आपकी नज़रों ने...

सत्य घटनेवर आधारित.. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, किराणा वगैरे आणायचा असल्यास सकाळी अकराच्या आत जाऊन आणावा लागतो. आमच्या घरात शेवटच्या क्षणी काम सांगण्याची पद्धत आहे, साधारण पावणे अकरा वाजता बायको ने हातात एक यादी ठेवली आणि आदेश दिला - "लवकर जा आणि हे सामान घेऊन ये. पावणे अकरा वाजलेत, आता दुकान बंद होईल पंधरा मिनिटात". मी पण एका गुणी नवऱ्या प्रमाणे ताबडतोब दुकान गाठले. अकरा वाजून गेले होते आणि दुकानदाराने शटर अर्ध बंद केलं होतं. आमची बरीच जुनी ओळख असल्या मुळे मी तसाच त्या अर्ध्या शटर खालून आत घुसलो. आतमध्ये फक्त दोन व्यक्ती होत्या...आणि आता तिसरा मी घुसलो होतो !! आमचा दुकानदार आणि एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली, तोंडावर व्यवस्थित मास्क, डोळ्यावर गॉगल आणि दोन वेण्या घातलेली एक आजी सदृश्य स्त्री बोलत उभे होते. मी धापा टाकत आत शिरलो होतो म्हणून चटकन लक्षात आले नाही. पण, थोड्या वेळात मला जाणवले की त्या बाईचा आवाज खूप ओळखीचा आहे. मी माझे काम विसरून त्यांचे बोलणे ऐकत होतो. त्या बाई इतक्या अदबीने आणि गोड आवाजात दुकानदाराची चौकशी करत होत्या की त्यांचं बोलणं ऐकत रहावस वाटलं. तेवढय...