आपकी नज़रों ने...
सत्य घटनेवर आधारित..
सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे, किराणा वगैरे आणायचा असल्यास सकाळी अकराच्या आत जाऊन आणावा लागतो. आमच्या घरात शेवटच्या क्षणी काम सांगण्याची पद्धत आहे, साधारण पावणे अकरा वाजता बायको ने हातात एक यादी ठेवली आणि आदेश दिला - "लवकर जा आणि हे सामान घेऊन ये. पावणे अकरा वाजलेत, आता दुकान बंद होईल पंधरा मिनिटात". मी पण एका गुणी नवऱ्या प्रमाणे ताबडतोब दुकान गाठले. अकरा वाजून गेले होते आणि दुकानदाराने शटर अर्ध बंद केलं होतं. आमची बरीच जुनी ओळख असल्या मुळे मी तसाच त्या अर्ध्या शटर खालून आत घुसलो. आतमध्ये फक्त दोन व्यक्ती होत्या...आणि आता तिसरा मी घुसलो होतो !!
आमचा दुकानदार आणि एक पांढरी शुभ्र साडी नेसलेली, तोंडावर व्यवस्थित मास्क, डोळ्यावर गॉगल आणि दोन वेण्या घातलेली एक आजी सदृश्य स्त्री बोलत उभे होते. मी धापा टाकत आत शिरलो होतो म्हणून चटकन लक्षात आले नाही. पण, थोड्या वेळात मला जाणवले की त्या बाईचा आवाज खूप ओळखीचा आहे. मी माझे काम विसरून त्यांचे बोलणे ऐकत होतो. त्या बाई इतक्या अदबीने आणि गोड आवाजात दुकानदाराची चौकशी करत होत्या की त्यांचं बोलणं ऐकत रहावस वाटलं.
तेवढयात दुकानदार पटकन माझ्या कडे वळून म्हणाला, साहेब तुम्ही यांना ओळखल नाही का? मी काही बोलणार इतक्यात त्या बाईंनी डोळ्यावरचा गॉगल काढला आणि मास्क काढता काढता पुन्हा एकदा त्या चिरपरिचित गोड आवाजात म्हणाल्या - "मी एवढा मास्क आणि गॉगल लावला आहे, त्यांना कशी ओळखू येईन?" तो चेहरा पाहुन मी धाडकन खाली कोसळलो !! त्या बाई म्हणजे साक्षात गान-सम्राज्ञी लता मंगेशकर होत्या !! मी जमिनीवर पडलो होतोच... तसाच आडवा होऊन दीदींना साष्टांग दंडवत घातला!! अरे, जो आवाज ऐकून लहानाचे मोठे झालो, तो स्वतः मूर्तिमंत आपल्यासमोर उभा आहे!! डोळ्यात पाणी आलं. काय करावं? काय बोलावं? काही सुचत नव्हतं!
दुकानदाराने मला हात धरून उभं केलं. मी उभं राहता राहता दीदींची माफी मागितली - "मला माफ करा, मी तुम्हाला ओळखलं नाही. म्हणजे, तुम्ही अशा प्रकारे एका किराणा दुकानात भेटाल असे स्वप्नातही वाटले नव्हते हो !"
मी हात जोडून उभा राहिलो. हनुमानाला राम दर्शन व्हावे तसे मला वाटत होते.
दुकानदार दीदींना म्हणाला - "दीदी, आमचे साहेब पण छान गातात बरं का ! गणपतीत मी त्यांचं गाणं ऐकलय !", पटकन माझ्या कडे वळून म्हणाला - "साहेब, एक दोन लाईन होऊन जाऊ द्या!"
तो एवढं बोलला आणि मी परत खाली पडतोय का काय असं वाटलं. दीदींच गाणं आपण ऐकायचं हे समीकरण माहिती असणाऱ्या माझ्या मनाला, आपलं गाणं दीदींना ऐकवावं हे पचनी पडत नव्हतं! चक्करच आली मला.. अशा अवस्थेतही मी माझे कान पकडले. म्हणालो - "अरे बाबा, मी दीदी समोर गायचं म्हणजे सूर्या समोर उदबत्ती धरल्या सारखं आहे रे! छे छे"
पण दीदींनी स्वतः आग्रह धरला (पुन्हा तोच गोड आवाज) - "मला ही आवडेल तुमचा आवाज ऐकायला."
अरे देवा... हे म्हणजे - आंधळा मागतो एक डोळा, अन देव देतो दोन - असं झालं. इथं तर मला देव दिव्य दृष्टीच देत होता !! आनंदाने हृदय विकाराचा झटका येईल का काय असं वाटत होतं.
आमचा दुकानदार पण भारी करामती, म्हणाला - "साहेब म्हणा की, किती भाव खाताय? "
मनात म्हटलं, भाव खाणारा मी कोण? इथे समोर साक्षात सरस्वती आहे. तिला बघूनच मला हर्षवायू झालाय, कंठातून शब्द फुटत नाहीयेत तिथे गाणं कुठून फुटणार?
पण, तरी मी स्वतःला सावरत, म्हणालो - "दीदी, तुम्ही हसणार नसाल तर तुमचंच एक गाणं सादर करतो" काही गडबड झाली तरी बेहत्तर पण अशी संधी सोडायची नाही हे त्याही अवस्थेत मनाला कळत होतं !! दीदींनी सुद्धा मानेनेच होकार दिला !!
मी पुन्हा एकदा दीदींचे चरण स्पर्श केले आणि त्यांनीच गाऊन अजरामर केलेलं "आपकी नज़रों ने समझा, प्यार के काबिल मुझे" गायला लागलो.
कधी-कधी वास्तव हे स्वप्नाहुन सुंदर असतं ते असं. खरच माझ्या सारख्या एका तुच्छ माणसाला असं गाण्याची संधी दीदींनी द्यावी? माझ्या मनात अगदी त्या गाण्यातल्या हिरोईन सारख्या भावना होत्या - "दिल की ऐ धड़कन ठहर जा... "
मी गाणं गात होतो आणि दीदी मस्त डोळे बंद करून त्या गाण्याचा आस्वाद घेत होत्या. त्यांना असं तल्लीन झालेलं बघून इतका हुरूप आला की काही विचारू नका. एक लाईफ टाइम परफॉर्मन्स देत होतो मी !!
सगळं सुरळीत सुरू असताना, अचानक ब्रेन फ्रीज व्हावा तसा मी पूर्ण ब्लॅंक झालो. पुढचे शब्दच सुचत नव्हते! माझ्या थांबण्याने दीदींची समाधी भंग झाली. पण तरी त्यांनी लगेच - "दो जहाँ की आज खुशिया, हो गयी हासील मुझे ... " अशी ती अर्धवट राहीलेली ओळ पूर्ण केली !! मला स्वतःची इतकी लाज वाटली की काही विचारू नका. आपण असे ब्लॅंक झालोच कसे??
दरदरून घाम फुटला.. घसा कोरडा पडला... जीव घाबरा झाला .. आणि... खाडकन डोळे उघडले !! बघतो तर आजूबाजूला किर्रर्र काळोख होता! मी चाचपडत मोबाईल शोधला. वेळ पहिली तर पहाटेचे 5:30 वाजले होते.. तसाच उठलो आणि "आपकी नज़रों ने समझा" गाणं लावलं. दिवसभरात ते गाणं कमीत कमी शंभर वेळा तरी ऐकलं असेल. दीदी जर मला अशा अचानक भेटल्या तर मला परत ब्लॅंक व्हायचं नाहीये ... काय आहे की पहाटे पडलेले स्वप्न खरं होतं म्हणे !!! :)
विशाल प्रफुल्ल कर्णिक
वाह..खूप छान स्वप्न आणि लिहलय पण एकदम मस्त..लवकरच ते पूर्ण होवो..👍
ReplyDeleteAgdi Filmy style zalay..... chaan mandani aahe.
ReplyDeleteMast
ReplyDeleteअरे क्या बात हे, खूपच छान
ReplyDeleteवाचताना मला खर्च एक क्षण असा विचार आला कुठल्या बर दुकानात आल्या असतील दीदी हडपसर ला
खूपच सुंदर
ReplyDeleteअसे स्वप्न पडायला पण भाग्य लागते, आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्या भाग्यासाठी सुद्धा बायको कारणीभूत असणे यापेक्षा दुसरे काय पाहिजे असते जीवनात?☺️☺️
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteसाक्षात लता मंगेकरांनी दर्शन दिले ही खूप मोठी गोष्ट आहे...फारच आवडला.. बघा कधी कधी शेवटच्या क्षणी कामं करण्याचा हा फायदा होतो...खूप छान लिहिलंय ...तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो हवं तर मी पण येईन किराणा दुकानात तुमच्या बरोबर😀
ReplyDeleteDukandarani haat dharun ubha kela 😀 Uttam jamlay bagha!!
ReplyDelete