थंडी, थंडी, थंडी...
थंडी ,थंडी, थंडी .. जेव्हा पासून माझं अमेरिकेला जायचं ठरलं, तेव्हा पासून "थंडी" या शब्दाने "वात" आणला होता. मी काही पहिल्यांदा चाललो नव्हतो. पण, या खेपेला जरा जास्तच सल्ले मिळत होते. "दादा, इकडे भयानक थंडी आहे, भरपूर गरम कपडे आण." या वाक्यात " भरपूर " या शब्दवर " भरपूर " जोर देत अमेरिकेतल्या बहिणीने बजावलं. "या खेपेला गरज पडली तर थोडी व्हिस्की वगैरे घे बिनधास्त." - अशी मोठ्या भावाने परवानगी दिली. बरं, घरचे कमी होते कि काय म्हणून मग मित्र, ऑफिस मधले सहकारी, कामवाल्या मावशी, बिल्डिंगचा वॉचमन, झालं तर इस्त्री वाला, भाजी वाला असे प्रत्येकाने जमेल तशा पद्धतीने सल्ले दिले. पेपर वाल्याने तर - "साहेब, बघा.. जमत असेल तर जायचं रद्द करून टाका." असा रद्दी सल्ला दिला. खरं सांगायचं तर सगळ्यांची काळजी काही निरर्थक नव्हती. या वर्षी थंडी जरा जास्तच होती. बातम्यांमध्ये सतत "ब्रेकिंग न्यूज" च्या नावाखाली थंडीचीच चर्चा सुरु होती. तिकडे, अमेरिकेत 'आर्क्टिक ब्लास्ट' आला होता. नेहमी पेक्षा तापमान खूप खाली उतरले होते. ...