दस का दम !!
रात्रीचे 10:00 वाजून गेले पण काम इतक्यात संपेल असे काही लक्षण नव्हते. ऑफिस मध्येच काम करत बसलो होतो. आज माझ्या बरोबर आणखीन एक जण थांबला होता. त्याला सतत त्याच्या घरून फोन येत होता आणि त्याचं detail interrogation सुरू होतं !! फोन आला की हा बाजूला जाऊन बोलून यायचा...
तितक्यात, मला सुद्धा माझ्या घरुन फोन आला. तो मोजून दहा सेकंदात संपला! माझं reporting इतक्या पटकन संपलेलं पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला !! न राहवून आणि आ वासून त्याने मला विचारलंच -"सर, इतका पटकन कसा संपतो कॉल तुमचा? मला बघा, इतके प्रश्न विचारले जातात की बस !! जेवला का? काय खाल्लं? अजून कोणी आहे का बरोबर? अजून किती वेळ यायला? बापरे किती ते प्रश्न !!"
मी त्याला विचारलं - "लग्नाला किती वर्षे झाली तुझ्या?"
थोडं लाजत त्याने उत्तर दिलं - "वर्ष कसलं सर, आताशी दहा महिनेच झालेत."
मी म्हणालो - "हाच तर फरक असतो दहा महिने आणि दहा वर्षे होऊन गेलेल्या लग्नात! दहा मिनिटांचे कॉल दहा सेकंदाचे होतात. आता मला फक्त "तू मेन डोअर ची चावी घेतलीस ना?" एवढा एकच प्रश्न विचारला जातो! काय आहे की, इतक्या वर्षांनंतर मी घरी उशीरा येणार म्हटल्यावर घरच्यांची झोप उडत नाही तर, आता माझ्या उशीरा जाण्याने त्यांची झोप मोडत तर नाही ना ह्याची काळजी असते. बास!!"
आम्ही खळखळून हसलो आणि त्याला पुन्हा त्याच्या घरून काॅल आला…
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
#kahihi
Comments
Post a Comment