Dinner
एका मीटिंग मधून दुसऱ्या मीटिंग मध्ये जाता-जाता त्याने सहजच मोबाईल चेक केला. बायको चा मिस्ड कॉल दिसला. "काय काम असेल?" असा विचार करतच त्याने कॉल-बॅक केला.
तो - " हं ! तू फोन केला होतास?"
ती - "हो. अरे, मी निघाले होते तर निघता-निघता बोलावं म्हटलं ..."
तो - "तू ? कुठे ?"
ती - " बघ, विसरलास ना? अरे सकाळीच आपला विषय झाला. मी आज आई कडे जाणार आहे. आठवडा भर मी नाहीये. .."
तिचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला - "ओह येस! आपला विषय झाला होता. चल हैप्पी जर्नी. पोचलीस कि फोन कर."
ती - "अरे, पण तू रात्री बाहेरच डिनर करायचा आहेस. लक्षात आहे ना? मी काही बनवलं नाहीये. एक तर माझं मलाच आवरता आवरता उशीर झालाय आणि.. "
तो - " अगं हो.. कळलं. आता निघतो. मीटिंग ला उशीर होतोय. रात्री फ्री झालो कि करतो तुला कॉल."
एवढं बोलून त्याने फोन ठेवला. तिने बोललेलं "OK .. ठीक" सुद्धा त्याने ऐकलं नाही !
त्याचा पुढचा अक्खा दिवस खूप बिझी गेला. सलग मीटिंग, नवीन प्रोजेक्टचं काम. रात्री ऑफिस मधून निघायला साडे बारा वाजले. पण दिवस मना सारखा गेला होता. प्रोजेक्ट चांगला आवाक्यात आला होता. काम आणि कामाचा विचार करतच तो घरी पोचला. दार उघडताना अचानक काही तरी आठवून तो ओरडला. ..
"ओह गॉड ! आज डिनर बाहेर करायचा होता. ही माहेरी गेलीये. तरी हिने फोन करून आठवण करून दिली होती."
आता काही खरं नव्हतं. अचानक डोक्या वरून कामाचं "भूत" उतरून पोटात "भूक" पेटली होती.
"जाऊदे , आपलीच चूक. एवढ्या रात्री जवळपास चे सगळे हॉटेल्स सुद्धा बंद झाले असतील. काही दूध वगैरे असेल तर पिऊन झोपावं लागेल आज"
स्वतःवर चिडत त्याने घरात प्रवेश केला. खांद्यावरची बॅग कोचावर भिरकावत त्याने थेट किचन गाठलं. फ्रिज उघडणार तोच त्यावर एक चिठ्ठी लावलेली पाहिली.
"फ्रिज मध्ये खिचडी करून ठेवली आहे आणि दूध सुद्धा आहे. ओव्हन मध्ये गरम करून घे. मला माहिती आहे कि तू डिनर चं विसरला असणार. दुपारच्या फोन वरून लक्षात आलं कि तू आज जास्तच बिझी आहेस. म्हणून ..."
चिठ्ठी वाचून त्याचं पोट जरी भरलं नसलं तरी मन आणि डोळे मात्र भरून आले होते...
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
Comments
Post a Comment