Promise !



"हॅलो! हा नंबर कुणाचा आहे ?"
पलीकडून आलेल्या या प्रश्नाने मी थोडा गोंधळलोच. मला फोन करून असं विचारणारी व्यक्ति म्हणजे विश्वास चे बाबा होते.
मी (पटकन स्वतःला सावरत उत्तर दिलं) - "काका मी विशाल बोलतोय. विश्वास चा मित्र"
काका - "विशाल? कोण विशाल?"
मी - "काका तुम्ही मला ओळखले नाहीत? मी विश्वास चा वर्गमित्र. लहान असताना बरेचदा आलोय तुमच्या कडे"
आम्ही शाळेत असताना बरेचदा विश्वासच्या घरी जात असू. विश्वास चे मित्र आलेत म्हटल्यावर काका एकदम खुश !! कधी भेळ आणून दे तर कधी चॉकलेट. काकांचा स्वभाव एकदम खेळकर. आम्हा मुलांना बघून ते "हाफ चड्डी गॅंग" म्हणून चिडवायचे !!!
काका - "अच्छा .. विशाल तू होय? कसा आहेस? अरे तुझ्या मोबाईल वरून इतक्यात ४-५ वेळा कॉल आलेत"
विश्वास भारतात असताना कधीतरी मी त्याचा हा नंबर माझ्या कडे सेव्ह केला होता. आता त्याला सिंगापोर ला जाऊन सुद्धा ५-६ वर्ष झाली होती. त्याचा हा नंबर तसाच माझ्या कडे राहिला होता. पण मी त्यावर कधी कॉल केले?
काका - "अरे बहुदा चुकून लागले असावेत. मी इथून बरेचदा हॅलो हॅलो म्हणालो पण तुझ्याकडून काहीच उत्तर येत नव्हतं"
मी - "ओह ! सॉरी काका. मी मोबाईल खिशात ठेवला आणि लॉक केला नाही त्यामुळे असा गोंधळ झाला ..."
काका - "अरे गोंधळ कसला? उलट चांगलं झालं की. त्यामुळे आपलं बोलणं तरी झालं. काय आहे ... विश्वास गेल्या पासून त्याचे मित्र सुद्धा आम्हाला विसरलेत. हा... तो सुट्टीसाठी आला तर मात्र सगळे येऊन भेटतात."
काकांच्या बोलण्यात तत्थ्य होतं. फक्त विश्वासच नाही, तर इतरही बरेच मित्रांच्या आई बाबाना हल्ली मित्र गावात आले तरच भेटणं होतं.
मी - " तसं नाही काका.. कामाचा व्याप ..."
काका - "असू दे. आता आम्हाला सवय झाली आहे"
मी - " तसं नाही काका. तुम्ही बघा या वेळी विश्वास यायच्या आधी येऊन जाईन"
काका - "बघ हा.. कारण विश्वास पुढच्याच महिन्यात येणार आहे"
मी - " तरी सुद्धा तो येण्या आधी एकदा मी तुम्हाला भेटेन.. Promise "
मना मध्ये उत्पन्न झालेली अपराधी भावना माझ्या तोंडून बोलून गेली!!
विश्वास च्या घरी जाईन जाईन म्हणता म्हणता २-३ आठवडे असेच निघून गेले.
एका शनिवारी सकाळीच आमचा वर्ग मित्र पिंट्या चा फोन आला.
पिंट्या - "विशाल, जसा असशील तसा विश्वास च्या घरी ये"
मी - "विश्वास राव आले वाटतं पुण्यात? "
पिंट्या - "आलाय तो आज सकाळीच"
मी - "अरेरे .. आता काका मला खूप चिडवतील. मी त्यांना promise केलं होतं की विश्वास येण्या आधी येऊन भेटेन म्हणून..."
पिंट्या - "I am afraid की तसं कधीच होणार नाही आता. विश्वास च्या बाबांना काल अटॅक आला आणि त्यांना देवाज्ञा झाली ... "
पुढचा बराच वेळ पिंट्या काही तरी बोलत होता पण मला त्यातलं काहीही ऐकू येत नव्हते....मन विषण्ण झाले होते...
"विश्वास येण्या आधी मी तुम्हाला येऊन भेटेन" हे promise पुर्ण करू शकलो नाही याची सल आता आयुष्य भर मनात राहणार होती..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह