खरा कोच ..




MacD मध्ये पाऊल ठेवलं आणि नेहमी पेक्षा आज इथे जास्त गर्दी आहे हे लक्षात आलं. कुठल्या तरी क्लब ची 10-12 मुलं तिथे होती. साधारण पाचवी-सातवीतली ती मुलं असावीत आणि नुकतंच कुठलं तरी मैदान मारून आलेत असं त्यांचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्यांचा तो ओसंडून वाहणारा उत्साह खरंच खूप भारी वाटत होता. 


त्यांच्यातल्या काही मुलांचे ऑर्डर देणे सुरु होते. त्यामुळे काउंटर ला गर्दी होती. माझ्या समोर त्यांच्यातलाच एक मुलगा आणि त्याच्या बरोबर बोलत उभा असलेला तरुण दिसला. तो तरुण त्यांचा कोच असावा. त्या दोघांमधलं संभाषण हे खूप हात वारे करत सुरु होत. थोडा वेळ नीट लक्ष दिल्यावर कळलं कि "तो" मुलगा मूक-बधिर आहे. पण बाकीची मुलं तर तशी नव्हती!! मला त्या तरुणाचं कौतुक वाटलं. त्याने खूप सफाईदार पणे "त्या" मुलाशी संभाषण सुरु ठेवलें होते. 


एक-एक करत मुलं ऑर्डर देऊन बाजूला सरकत होती आणि त्या दोघांचा नंबर आला. मला वाटलं कि दोघेही एकत्र पुढे जातील. पण तसं काही झालं नाही. दोघांचे बोलणे आणि हातवारे सुरूच होते.  शेवटी तो तरुण किंचाळलाच "You have to go !" आणि त्या मुलाला पुढे ढकलून स्वतः दोन पावले मागे सरकला. तिकडे उपस्थित सगळ्या लोकांना (माझ्या सहित) त्या तरुणाचं हे असं ओरडणं जरा विचित्र वाटलं !


मुलगा भीतभीतच पुढे गेला. मला एक क्षण त्या कोच ला म्हणावं वाटलं कि "अरे बाबा तुला त्याची भाषा कळते तर हो ना पुढे. कर त्याची मदत." पण मी काही बोलायच्या आत कोच ने "त्या" मुलाकडे पाठ फिरवली आणि इतर मुलांशी गप्पा मारू लागला. 


तिकडे काउंटर वर "त्याची" धडपड सुरु झाली. खूप जोरात तो हातवारे करून काय हवंय ते सांगण्याचा प्रयत्न करत होता. काउंटर वरची मुलगी त्याला काय हवंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. थॊड्या वेळाने तिची चीड चीड होऊ लागली. तिची आदळ आपट सगळ्यांच्या लक्षात येत होती. त्या मुलाने मागे वळून आपल्या कोच कडे पाहिलं. पण कोच मात्र त्याच्या इतर मुलांमध्ये रमला होता. मला राहवलं नाही. मी त्या कोच ला बोलावलं आणि म्हणालो  - "I think he needs some help"


कोच ने त्या मुलाकडे एकदा पाहिलं आणि माझ्या कडे वळून म्हणाला "I don't think so !" तो पुन्हा आपल्या इतर मुलांशी गप्पा मारू लागला !


मला हे उत्तर एकदम अनपेक्षित होते आणि खटकले ही. माझ्या डोक्यात एक प्रकारची सणक गेली. याला काय अर्थ आहे! तुमचा विद्यार्थी तिकडे धडपडतो आणि तुम्ही सरळ त्याच्याकडे पाठ फिरवता? त्या पोराने कसा विश्वास ठेवायचा आपल्या कोच वर? नाना प्रकारचे प्रश्न आणि विचार माझ्या मनात येत होते.  


माझ्या विचारांची साखळी "त्या" मुलाच्या जल्लोषाने तुटली!  त्याच्या हातात ऑर्डर ची पावती होती आणि त्याने पटकन येऊन आपल्या कोच ला मिठी मारली ! कोच पण त्याला उचलून म्हणाला "I told you, its your battle and you will win !!" त्या मुलाच्या चेहर्या वर विजयाची झळाळी आली होती ! 

 

खरंच त्याने त्याची "battle" जिंकली होती. कोच ने त्याला मदत नाकारून त्याची "खरी" मदत केली होती !!   


मी जाता जाता त्या कोच ला thumbs up करून एक प्रकारे Salute केलं !! फक्तं खेळातच नाही तर आयुष्यातल्या "battles" जो जिंकायला शिकवतो तोच खरा कोच  हे त्या दिवशी शिकलो !!


- विशाल प्रफ़ुल्ल कर्णिक


Comments

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह