इच्छापत्र





वृद्धाश्रमात येऊन शकुंतला बाईंना साधारण चार वर्षे झाली असतील. सत्तर च्या आस-पास वय. पण सुखवस्तू घरातून आल्यामुळे चेहऱ्यावर वेगळीच चमक होती. राहणीमान सुद्धा एकदम व्यवस्थित. पाच वर्षांपूर्वी दत्तोपंत - म्हणजे शकुंतला बाईंचे मालक - गेले आणि सहा महिन्याच्या आत बाईंची रवानगी वृद्धाश्रमात झाली. मोठ्या मुलाने तळ मजला आणि छोट्या ने पहिला मजला असं वाटून घेतलं. बाईंनी आणि पंतांनी पै-पै जोडून बांधलेल्या त्या दोन मजली "पंढरी" मध्ये आता बाईंच्या नावाची एक "वीट" सुद्धा उरली नव्हती. पंतांचा धाक गेला आणि मुला-सुनांनी रंग बदलला. बाईंनी कित्येकदा मुलांकडे विनवणी केली होती. "बाबांनो, एका कोपऱ्यात पडून राहीन. पण,उरले-सुरले दिवस 'पंढरीत' घालवू दे. मालकांची आठवण आहे त्यात" आणि दर वेळी मुलांनी खोटी आश्वासनं देऊन त्यांची बोळवण केली. अगदी बाईंना कॅन्सर झालाय हे कळल्यावर सुद्धा मुलांनी त्यांच्या कडे लक्ष दिले नव्हते. पण, आज बाईंनी अचानक आपल्या मुलांना सहकुटुंब बोलावून घेतले होते. आजच्या भेटीला वकील काकांना सुद्धा बोलावले होते. श्री. मोकाशी हे पंतांचे वकील मित्र, त्यांचा पंतांच्या कुटुंबाशी चांगला घरोबा होता. सकाळपासून आश्रमाच्या काना-कोपऱ्यात या मीटिंग ची चर्चा सुरु होती.

"बरं, सगळे आले असतील तर मी शकुंतला देवींचे इच्छा पत्र वाचून दाखवू इच्छितो!" वकील काका बोलू लागले. मुलांना एकदम आश्चर्य वाटले. कारण, त्यांच्या माहिती प्रमाणे, आई ने इच्छा पत्र वगैरे बनवावे असे काही तिच्या कडे उरले नव्हते. "त्यांनी इच्छा पत्र का बनवलं ? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. पण, बाईंच्या माहेरहून त्यांना काही प्रॉपर्टी मिळाली आहे. बेळगाव च्या जवळ चार एकर जमीन आणि इतर व्यवहारातून साधारण ७० लाख अशी ती रक्कम आली आहे. आता बाईंनी त्या संपत्तीची वाटणी करायचे ठरवले आहे. बाईंनी तुम्हा दोघांना २-२ एकर जमिन आणि मिळालेल्या रकमेत अर्धा-अर्धा हिस्सा द्यायचे ठरवले आहे. म्हणजे, प्रत्येकी पस्तीस लाख!!"


(वकील काकांचे बोलणे अजून सुरु होते, पण मुलांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.) "पण, त्या मध्ये बाईंनी २ अटी ठेवल्या आहेत." "अटी? कसल्या अटी?" मोठ्या मुलाने विचारले.

"यात पाहिली अट म्हणजे - ही सगळी सम्पत्ती तुम्हाला बाईंच्या मृत्यू नंतरच मिळणार." "आणि दुसरी?" छोट्याचा प्रश्न. "आणि दुसरी अट म्हणजे - जर त्यांचा मृत्यू काही अनैसर्गिक पद्धतीने म्हणजे अपघात, खून वगैरे ने झाला तर सगळी सम्पत्ती या वृद्धाश्रमाला मिळेल." या दोन अटी ऐकल्या आणि दोन्ही मुलांना दरदरून घाम फुटला. आईला या असल्या अटी ठेवण्याची काही गरजच नव्हती. का उगाच तिढा वाढवला? दोघा मुलांना बाजूला घेत वकील काका कुजबुजले - " हे बघा, रक्कम मोठी आहे. तसंही बाईंची तब्येत अलीकडे ठीक नसते. तुम्हाला तर माहीतच आहे त्यांना कॅन्सर झालाय. Third stage आहे. जास्तीत जास्त चार महिने. मग, सगळं तुमचंच आहे. शहाणे असाल तर बाईंना आपल्या बरोबर घेऊन जा.देव ना करो, इथल्या लोकांची नियत खराब झाली तर? पाय घसरून पडल्या, अस सांगायला किती वेळ लागतो? अपघातात गेल्या तर सगळी सम्पत्ती कुणाची? बाकी, समजूतदार माणसाला इशारा पुरेसा आहे.. काय?"

काकांचे बोलणे संपते ना संपते तोच मोठा मुलगा बोलला "अरे वा ! असं कसं ? आमची आई काय जड आहे होय आमच्या साठी? चांगलं दोन मजली घर आहे. ती म्हणतच असते कि तीचं इथे मन रमत नाही म्हणून ... " त्याला तोडत दुसरा म्हणाला "अगदी बरोबर आहे दादा तुझं" तडका फडकी निर्णय घेऊन मुलांनी आपल्या आईला घरी आणले. दोन्ही मुले डोळ्यात तेल घालून आई वर लक्ष ठेवून होते. एक नर्स पण ठेवली बाईंची काळजी घ्यायला. अधून मधून वकील काका फोन करायचे, कधी भेटून जायचे आणि आवर्जून मुलांना मिळणाऱ्या पैशांची आठवण करून द्यायचे. काही महिन्यातच बाईंनी समाधानाने आपल्या "पंढरीत" जीव सोडला. कॅन्सरच तो, घेऊन गेला.


दोन्ही मुलं वकील काकांना भेटायला आली.


मोठा म्हणाला - "काका, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. कॅन्सर मुळे आई गेली. तिच्या इच्छा पत्रा प्रमाणे .. " त्याला मध्येच थांबवत वकील काका म्हणाले - "इच्छा पत्र? कुठलं इच्छा पत्र?" छोटा मुलगा - "अहो, असं काय करता काका, तुम्ही वृद्धाश्रमात जे वाचून दाखवलत ते." वकील काका हसले - "तुम्हाला कुठली 'माया' कळते हे बाईंना बरोबर माहिती होते !! शेवटी ती आई होती तुमची." मुलांनी विचारले - "म्हणजे?" खळखळून हसत वकील काका म्हणाले - "अहो, म्हणजे असं, की शकुंतला बाईंना आधीच माहिती होतं कि त्यांचे आता जास्त दिवस उरले नाहीत. त्यांच्या "पंढरीत" शेवटचा श्वास घ्यावा हीच त्यांची इच्छा. तुम्ही सरळ पणे त्यांना न्यायला तयार नव्हता, म्हणून त्यांनीच एक नाटक रचलं. त्यांनी रचलेल्या नाटकात मी फक्त त्यांना साथ दिली. त्यांना कसलीच संपत्ती वगैरे मिळाली नव्हती .. बाकी तुम्ही समजूतदार आहात ... आणि समजूतदार माणसाला इशाराच पुरेसा आहे.. नाही का?"



- विशाल प्रफुल्ल कर्णिक









 

Comments

  1. Well written Vishal , keep writing

    ReplyDelete
  2. Ekach no...bhannat...tuza marathiwarcha prabhutwa changla ahe

    ReplyDelete
  3. Mast...Aai shivay mulana koni olkhu shakat nahi he khara👍🏻

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर शेवटी आई ती आईच

    ReplyDelete
  5. का ही ही..... म्हणा पण गोष्ट फारच अप्रतिम सादर केली

    ReplyDelete
  6. कथा उत्तम

    स्वार्थी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं तरंच कळतं.

    ReplyDelete
  7. Khoop mast lihlay.....keep it up👌👏

    ReplyDelete
  8. Replies
    1. Thanks!! You are right, it's a sad truth though...

      Delete
  9. विशाल खुपच छान लघुकथा लिहिली आहेस. खरेच काही जी माणसे आई वडील यांना अशी वागणूक देतात त्यांना या लघुकथेच्या अनुषंगाने एक चपराकच आहे.

    ReplyDelete
  10. Very Touching..A true mirror to the harsh reality of today's situation..But the way Shankutla Bai takes control of the scene and leaves behind a lesson for her family is much needed in real sense .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Long drive

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह