शाळा
आज अचानक काम वाल्या मावशींचा फोन आला. कोरोना च्या संकटात इतर असंख्य लोकांसारखं त्यांनी सुद्धा आपल्या गावी जाणं पसंत केलं. जवळपास 3 महिन्यांनी त्यांच्याशी बोलत होतो.
इकडची-तिकडची ख्याली खुशाली विचारून झाल्यावर त्यांनी विचारलं - "छोटू काय म्हणतुया? त्यो बी लई कंटाळला असल ना? शाळा बी बंद हाय लै दिवस."
"अगदी तसं काही नाही. आता त्याची ऑनलाइन शाळा सुरू झालीये. ऑनलाइन म्हणजे कॉम्प्युटर वर. त्याच्या साठी नवीन कॉम्प्युटर घेतला बघा! सकाळचा वेळ शाळा, मग दुपारी क्लास, कधी चित्रकला, तर कधी अजून काहीतरी चालू आहे! काय आहे, शाळेत जरी जाणं होत नसलं तरी आता असच काहीतरी करून शिक्षण सुरु ठेवावं लागणार मुलांचं" - मी उत्साहात सांगत होतो!!
"बर, तुमच्या मुलीचं कसं सुरू आहे? तिची सुद्धा ऑनलाईन शाळा सुरु असेल ना ?" मी त्यांना विचारलं
"न्हाई वो दादा, तिला काढून टाकलं शाळेतून" - त्यांनी अगदी सहजपणे सांगून टाकलं
"अहो मावशी असं काय करता? हे बघा, सध्या सगळ्या शाळा ऑनलाइन आहेत. अगदी मोबाईल वर पण चालू आहेत. तुम्हाला मोबाईल ची काही अडचण आहे का? मी लगेच चांगला मोबाईल घेता येईल इतके पैसे पाठवतो. ताबडतोब पोरीची शाळा सुरू करा. ती हुशार आहे, तिने पुढे शिकलं पाहिजे." त्या मला अशा प्रकारची अडचण सांगणार नाहीत हे मी जाणून होतो. तशा त्या खूप स्वाभिमानी आहेत. मी पुढे काही बोलणार इतक्यात त्या म्हणाल्या
"तसं नाही दादा, तिला मी माझ्या संग शेतात घेऊन जाते रोजंदारीवर. तेवढाच घरी अजून थोडासा पैका येतूया. या म्हांमारित समद्यांच्या हातचं काम गेलं. आता गावाकडं जे बी मिळतंय ते करतुया. कशी-बशी चूल पेटतीया. लेकीनं शिकलं पायजे, पर त्या साठी आधी जगलं पायजे ना? जगलो तर शाळा करता येईन नंतर कवा बी"
त्यांचं बोलणं ऐकून पुढे काय बोलव हे मला सुचत नव्हतं. पण, नियतीने प्रत्येकाला वेगळ्या शाळेत घातलंय याची आज प्रकर्षाने जाणीव झाली होती !!
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
True...Sagal viskalit zhalay sadhya chya situation madhe...
ReplyDeleteVery nice!
ReplyDeleteसत्य परिस्थिती आहे
ReplyDeleteखूप छान
खूप छान, आपण जग नेहमी आपल्याच चष्म्यातून बघत असतो..आणि ते तसेच असते आहे असेच आपल्याला वाटते.ह्या गोष्टीतल्या मावशीनंसारखी लोकं आपल्याला चष्म्यातून न दिसणाऱ्या जगाची जाणीव करून देतात...
ReplyDeleteयोगेश
Nice,
ReplyDeleteIts real fact.
Khup chan..
ReplyDeleteFact !!
ReplyDeleteसत्य परिस्थिती
ReplyDeleteKharay ....
ReplyDeleteSundar kharach ahe he aj (sonal)
ReplyDeleteKhoopach heart touching... excellent wordings....ha lekh awadla
ReplyDelete