थंडी, थंडी, थंडी...
थंडी ,थंडी, थंडी .. जेव्हा पासून माझं अमेरिकेला जायचं ठरलं, तेव्हा पासून "थंडी" या शब्दाने "वात" आणला होता. मी काही पहिल्यांदा चाललो नव्हतो. पण, या खेपेला जरा जास्तच सल्ले मिळत होते.
"दादा, इकडे भयानक थंडी आहे, भरपूर गरम कपडे आण." या वाक्यात "भरपूर" या शब्दवर "भरपूर" जोर देत अमेरिकेतल्या बहिणीने बजावलं. "या खेपेला गरज पडली तर थोडी व्हिस्की वगैरे घे बिनधास्त." - अशी मोठ्या भावाने परवानगी दिली. बरं, घरचे कमी होते कि काय म्हणून मग मित्र, ऑफिस मधले सहकारी, कामवाल्या मावशी, बिल्डिंगचा वॉचमन, झालं तर इस्त्री वाला, भाजी वाला असे प्रत्येकाने जमेल तशा पद्धतीने सल्ले दिले. पेपर वाल्याने तर - "साहेब, बघा.. जमत असेल तर जायचं रद्द करून टाका." असा रद्दी सल्ला दिला. खरं सांगायचं तर सगळ्यांची काळजी काही निरर्थक नव्हती. या वर्षी थंडी जरा जास्तच होती. बातम्यांमध्ये सतत "ब्रेकिंग न्यूज" च्या नावाखाली थंडीचीच चर्चा सुरु होती. तिकडे, अमेरिकेत 'आर्क्टिक ब्लास्ट' आला होता. नेहमी पेक्षा तापमान खूप खाली उतरले होते. पण म्हणून काय झालं? उठ सुठ जो भेटेल त्याने सल्ला द्यायचा म्हणजे काय? रागाच्या भरात हाताला लागतील तसे आणि घरात होते-नव्हते ते सगळे गरम कपडे मी बॅग मध्ये कोंबले. आता, Extra luggage charge भरावा लागला तरी बेहत्तर !
माझ्या मनात ढोबळ हिशोब तयार होता. पुण्यातल्या ८ अंश थंडी(?) मध्ये आपल्याला एक जॅकेट पुरेसं होतं, तर उणे ३० ला बॉडी वॉर्मर, त्यावर जाड स्वेट शर्ट, त्यावर २ स्वेटर आणि त्यावर लेदर जॅकेट ... काय बिशाद आहे थन्डी ची आपल्याला "टच" करायची? हे सगळे लोकं उगाच बातम्या बघून बडबड करतात. असो... आपली तयारी व्यवस्थित झाली आहे, घाबरण्याचं कारण नाही. माझी मीच स्वतःला शाबासकी दिली आणि निघालो ....
मुंबई विमानतळावरच मला थंडी ने पहिला दणका दिला.अमेरिकेत झालेल्या अति हिमवृष्टी मुळे, माझं मुंबई-नेवार्क विमान दोन तास उशिरा निघणार होतं. म्हणजे, पुढच्या फ्लाईट चे गणित चुकणार हे नक्की होतं. दोन तास म्हणता म्हणता चांगला चार तास उशीर झाला उड्डाण भरायला. नशीब एवढंच की, इतर बऱ्याच फ्लाईट्स प्रमाणे आमची फ्लाईट कॅन्सल झाली नाही. मुंबई ते नेवार्क प्रवास सुखरूप झाला. पण पुढे इंडियाना पोलीस कसं गाठायचं हा प्रश्न होताच. Immigration होऊन enquiry counter येई पर्यंत एवढं कळलं होतं की इथे खूप साऱ्या फ्लाईट्स रद्द झाल्यात. प्रश्न होता की मला किती वेळ नेवार्क मध्ये काढायचा? आणि कसा काढायच? कसा बसा counter पर्यंत पोचलो. Counter वाल्या बाई ने बराच वेळ तिच्या कॉम्पुटर वर काही तरी पाहिले. तिचा चेहरा इतका गंभीर होता कि असे वाटले इथूनच परत भारतात पाठवते!! पण सुदैवाने तसं काही झालं नाही आणि तिने माझ्या हातात दुसर्या दिवशी सकाळचं तिकीट आणि hotel stay चं complimentary voucher ठेवले. हॉटेल ची shuttle घेऊन आधी हॉटेल गाठले. सकाळी ८:३० ची फ्लाईट होती , पण shuttle आम्हाला न्यायला ६:०० लाच येणार होती. मी त्या प्रमाणे अलार्म वगैरे सेट करून झोपी गेलो.
सकाळी वेळे आधीच जाग आली. खरं तर, मी झोपलोच नव्हतो जेटलॅग मुळे !! पण, पहाटे ५:३० वाजताच मी खाली lobby मध्ये येऊन बसलो. माझ्या सारखेच त्या shuttle साठी अजून दहा-बारा लोकं पण होते. हातात मस्त गरमा-गरम कॉफी चा कप घेतला आणि shuttle ची वाट पाहत बसलो. बरोबर ६ वाजता shuttle आली. मी चपळता दाखवून हॉटेल च्या दारातून बाहेर पडलो..
पण पण पण .. मी जितक्या जोरात बाहेर गेलो त्याच्या पेक्षा जास्त जोरात माघारी पळत आलो. त्या १० सेकांदात माझे नाक, कान, हात आणि पाय जणू गायब झाले असं मला वाटलं ! हॉटेल मधल्या हीटर्स मुळे बाहेर काय गारठा आहे हे लक्षात येत नाही. पण उणे 3० तापमानात मी हात मोजे , कान टोपी वगैरे काहीही न घालता जाण्याचं धाडस केलं होतं !! आणि खरं सांगतो, असल्या थंडीत जर वारं सुटलं असेल तर काही खरं नाही !! “अंगात वारं शिरणं” म्हणजे काय हे आज मला चांगलंच कळलं. Lobby मध्ये येऊन आधी वुलन हात मोजे मग त्यावर लेदर चे ग्लोव्हस , कान टोपी , वर मफलर , स्वेटर आणि त्यावर पुन्हा लेदर च जॅकेट परिधान केले. बर, मी आधीच बॉडी वॉर्मर घातला होता. त्या मुळे आता पूर्ण पोशाख घातलाय असं फीलिंग आलं !
मी तयार होत होतो तोवर बरेच लोकं माझ्या पुढे गेले. मी बाहेर जाऊन पुन्हा shuttle जवळ पोचलो. माझ्या पुढे मोजून ४ लोकं होती. shuttle चा ड्राइव्हर प्रत्येकाचे तिकीट पाहून सामान ठेवून घेत होता. या खेपेला मला बाहेर पडून चांगले ३० सेकंद होऊन गेले पण अजून पण माझ्या Chill खताने माझा चांगला बचाव केला होता. काय थंडी? कसली थंडी ? असे प्रश्न मनाला शिवून गेले. मनातल्या मनात मी माझी पाठ थोपटली.
पण पण पण ... हे सगळं क्षणभंगुर ठरले !! पुढच्या १० सेकंदात थंडी ने माझे चिलखत भेदले. वाऱ्याने जमेल तिथून आणि जमेल तसा मला झोडपायल सुरुवात केली. माझे नाक कुठल्या ही क्षणी तुटून जाईल असे वाटले. माझ्या हातांनी मी सतत त्याला चोळून गरम करत होतो. थंडी ने गुलाबी, बोचरी, प्रचंड ह्या सगळ्या लेव्हल्स पार केल्या होत्या ! मला कोणी तरी माझ्या हाडांना सुई टोचत आहे असा त्रास व्हायला लागला. हळू हळू हाता पायाची बोटं सुद्धा संवेदन शून्य झाली. पुढच्या १० सेकंदात माझी “शूर्पणखा” होईल का काय असे वाटले !! हातातली बॅग सरळ त्या ड्राइवर कडे भिरकावून द्यावी असे वाटले .. एक एक सेकंद जणू मला एक एक तास वाटत होता. एक क्षण तर रडूच आले पण डोळ्यातले पाणी सुद्धा त्या निर्दयी थंडी ने गोठून गेले होते. कसा बसा माझा नंबर आला आणि त्या shuttle च्या ड्राइव्हर ने माझी बॅग घेतली. त्याने त्या बॅग च काय केलं हे देखील पाहायला मी थांबलो नाही. जमेल तेवढं बळ एकवटून मी shuttle मध्ये झेप घेतली. त्या क्षणाला मला जर कोणी “स्वर्ग कसा असतो?” असे विचारले असते तर “ह्या shuttle सारखा” असेच उत्तर मी दिले असते. पुढचे कैक मिनिट मी माझे नाक, कान, हात, पाय शाबूत आहे न हे चाचपडत होतो. पुढे फ्लाईट वगैरे व्यवस्थित मिळून प्रवास नीट झाला. पण, hotel ची lobby ते shuttle ची seat हा प्रवास मला चांगलाच धडा शिकवून गेला.
त्या दिवसा नंतर पुण्याच्या "गुलाबी" थंडी बद्दल माझ्या मनात नितांत आदर निर्माण झाला हे नक्की !!
- विशाल प्रफुल्ल कर्णिक
Tuzya likhanat thoda pula Cha bhas zala .....tuze Marathi mast ahe.ani lekhashaili dekhil
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDeleteKhup ch chan
ReplyDeleteफारच छान
ReplyDelete