एकमत
एकदा आमच्या चाळी मध्ये हस्ताक्षर स्पर्धा झाली. मी सुद्धा त्यात सहभागी झालो आणि हस्ताक्षर स्पर्धे साठी हसत अक्षरं लिहून दिली.
स्पर्धा फारच अटी-तटीची झाली. स्पर्धकांनी पेपरवर लिहून दिल्यावर खूप वेळ तीनही परीक्षकानीं खूप गंभीर चर्चा केली. चांगला पाऊण तास मंथंन झाल्यावर, त्या परीक्षकांपैकी सगळ्यात "सीनीयर" जोशी काका निकाल सांगायला उभे राहीले. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
जोशी काका - "आज या स्पर्धेने खर्या अर्था ने परीक्षकांचीच परीक्षा पाहिली असे म्हणावे लागेल. एक से बढकर एक हस्ताक्षर. आम्ही स्वतंत्रपणे काढलेल्या क्रमवारी मध्ये प्रत्येक स्पर्धक वेगळ्या नंबर वर होता. म्हणजे तीन ही परीक्षकांचे कुठल्याच नावावर एकमत नव्हते."
ते पुढे बोलत राहिले - "हा... पण जसा प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो तसा इथे सुद्धा एक अपवाद आहे. तो अपवाद म्हणजे विशाल !! त्याच्या क्रमवारी साठी आमचं क्षणार्धात एकमत झाले. त्याच्या मुळे आमचा थोडा वेळ वाचला. तेवढ्या साठी विशाल ला खास धन्यवाद !!"
इथे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. एकदम सेलिब्रिटी असल्या सारखं वाटलं.
मनात म्हटलं - मी उगाच स्वतः च्या अक्षराला नावे ठेवतो. माझ्या पेक्षा पण लोकांचे अक्षर खराब आहे म्हणायचे !!
काकांनी हात वर करून सगळ्यांना शांत व्हायला सांगितले आणि म्हणाले - "हे बघा, विशाल आम्हा तिघांच्या यादी मध्ये सेम नंबर ला आहे हे खरं आहे, त्याच्या बद्दल आमचे झटक्यात एकमत झाले हे सुद्धा खरं आहे, पण तो शेवटच्या क्रमांकावर आहे हे लक्षात घ्या !"
अचानक सगळं वातावरण फिदी-फिदी हसण्याच्या आवाजाने भरून गेले आणि मी स्वतःला "एकमत पुरस्कार" देऊन मोकळा झालो (अर्थात मनातल्या मनात) !
विशाल प्रफुल्ल कर्णिक
30/Dec/2021
भारी होता 'एकमत पुरस्कार'! :-)
ReplyDeleteएकमताने १ नंबर!! :-)
ReplyDelete👌😄
ReplyDelete