मी आणि गीता
माझा आणि गीते चा पहिला संबंध हिंदी चित्रपटातल्या कोर्ट सीन मुळे आला. मला आठवते कि तेव्हा दूरदर्शन वर आठवड्यातून एकदा चित्रपट दाखवायचे. त्यात न्यायालयात एखादा गुन्हेगार काहीतरी बोलणार तितक्यात एक मक्ख व्यक्ती हातात एक जाड पुस्तक आणायची आणि म्हणायची - "गीता पर हात रख कर कसम खाओ…" वगैरे वगैरे.. पण, त्या वयात ती गीता म्हणजे नक्की काय? हे कळत नव्हते.
त्यानंतर जर कुठली गीता लक्षात राहिली असेल तर ती "सीता और गीता" मधली हेमा मालीनी. बेधडक , बिनधास्त असणारी ही गीता सुद्दा आम्हाला दूरदर्शन नेच दाखवली होती. अर्था-अर्थी ह्या गीता चा आणि महाभारतातल्या गीता चा काही संबंध नसला तरी "गीता" हे नाव ह्या चित्रपटामुळे मनावर चांगलंच बिंबलं.
नंतर मी जेव्हा आठ-नऊ वर्षांचा असेन, तेव्हा बी. आर. चोप्रा यांची महाभारत सिरीयल सुरु झाली. त्याच्या सुरुवातीला महेंद्र कपूर ह्यांच्या धीर गंभीर आवाजातला "यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिरभवती भारत... " असा श्लोक शीर्षक गीता मध्ये यायचा. तो, माझा गीतेच्या श्लोकाशी आलेला पहिला संबंध. पण तरी, त्या वेळी हा श्लोक गीतेतील आहे हे माहिती नव्हतं.
मग पुढे त्याच महाभारताच्या कुठल्या तरी भागात युद्ध भूमी वर पराकोटी चा गोंधळलेला अर्जुन आणि त्याला काही तरी उच्चं प्रतीचं ज्ञान देणारे श्री कृष्ण अजूनही आठवतात. हे जे काही श्री कृष्ण सांगत आहेत ह्याला गीता म्हणतात हे घरच्यांनी सांगितलं. अर्थात तेव्हा पण "श्री कृष्ण हे काय सांगत बसलेत लढाई करायचं सोडून?" असे वाटायचे. थोडक्यात काय, तर कुरुक्षेत्रात गीता ऐकणाऱ्या अर्जुनाची आणि T.V वर गीता सुरु असताना आमची अवस्था समान होती. ती म्हणजे "गोंधळलेली". सारखं वाटायचं - "उचला पटकन ते धनुष्य बाण आणि संपवून टाका सगळे कौरव". आमच्या बालमनाला त्या अर्जुनाच्या मनातल्या युद्धा शी काही देणं घेणं नव्हतं.
असो. तर असे एक ना अनेक वेळा माझा गीता शी संपर्क आला. पण, मला खरी गीता उमगली ती मी FY ला असताना. त्या सुमारास माझी आई अचानक आजारी पडली. तिला कॅन्सर झाला असे निदान झाले. पुण्याच्या KEM मध्ये महिनाभर तिच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी जमेल तसे कधी मी, कधी भाऊ, कधी वडील असे आम्ही हॉस्पिटल मध्ये तिच्या जवळ बसत असू.
एक दिवस अचानक माझ्या मोठ्या मामाने माझ्या हातात एक पुस्तक आणून ठेवले आणि "हे वाचायला लाग" असा सल्ला दिला. ते पुस्तक म्हणजे "गीता" होती. म्हणजे गीतेचा हिंदी भाषेतला अनुवाद होता तो. माझे डोळे एकदम चमकले. मनात विचार आला कि "अरे, मामाने काय हे म्हाताऱ्या लोकांचे पुस्तक दिले" द्यायचच तर किमान "श्रीमान योगी" किंवा "मृत्युंजय" तरी द्यायचे. छान वेळ गेला असता दवाखान्यातला. पण, मामाने ते इतक्या गंभीर पणे दिले कि मी ही ते चुपचाप घेतले. आईला बरे वाटावे म्हणून तसें ही गणपती, मारुती, पांडुरंग, शंकर, दुर्गामाता, शितळा देवी.. एवढंच काय चर्च आणि दर्गाह सुद्धा करत होतो. त्या यादीत आता "श्री कृष्ण" असे म्हणून मी ते पुस्तक वाचायला घेतले.
पुस्तक हातात आल्या पासून मी ते झपाटल्या सारखे वाचले. अक्षरशः तीन-चार दिवसात वाचून संपवले. एक प्रकारे दैवी प्रेरणा झाली असे वाटत होते. त्या आधी मी कधीच कुठले पुस्तक इतके सलग वाचले नव्हते. जणू मी गीतेच्या आहारी गेलो होतो. सकाळी घरून निघालो कि जमेल तितक्या देवळात हजेरी लावायची आणि आई जवळ बसून गीता वाचायची. गीतेतले श्लोक जरी जास्त कळत नसले तरी अनुवादित अर्था मध्ये मी पूर्ण डुंबत होतो.
पुस्तक संपल्यावर सुद्धा सतत त्यातले काही तरी संदर्भ डोक्यात रुंजी घालत होते. एक प्रकारची नशाच चढली होती. असे करता करता आठ-दहा दिवस गेले आणि… २७ जानेवारी ला आमच्या घरी सूर्य उगवलाच नाही! महिना भराची कॅन्सर बरोबर ची लढाई संपली होती. आई आम्हाला सोडून गेली. कवी ग्रेस म्हणतात तसे - "ती आई होती म्हणुनी, घन व्याकुळ मीही रडलो". त्याही परिस्तिथीत गीतेचे "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि…" डोक्यात घोळत होतं. कुठे तरी सारखं जाणवत होतं की गीता मला कोलमडू देत नाहीये. अर्थात, अशावेळी आणि नंतरसुद्धा माझ्या आजू बाजूच्या खूप लोकांनी मला आधार दिला, माझी मदत केली. पण, एकटा असताना मला कधी एकटं वाटलं नाही ते फक्त गीते मुळे! गीता वाचल्याने जे व्हायचे होते ते काही बदलले नाही. पण, प्रत्येक घटने कडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन कायमचा बदलला एवढं मात्र नक्की...
योग्य वेळी मला गीतेच्या स्वाधीन करणाऱ्या माझ्या अशोक मामाचा मी सदैव ऋणी राहीन!!!
-विशाल प्रफुल्ल कर्णिक
काय बोलणार?? शब्दच नाहीत....
ReplyDeleteतुम्ही गीता वाचन सातत्याने केल्यास त्याच वेळी गीता समजेल असे नाही पण काही प्रसंग असे येतात की त्या वेळी त्यातला अर्थ उलगडतो, त्रयस्थ म्हणुन कस राहावं ही गीता उत्तम पद्धतीने आपल्याला शिकवते
ReplyDeleteअगदी खरं. आणि आयुष्याच्या वेगळ्या वेगळ्या वयात वेगळा अर्थ लागत जातो 🙂
Deleteखूपच छान...वाक्यरचना 🙏
ReplyDeleteनिःशब्द झाले. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तुला पुढील आयुष्यात श्रीकृष्णाने अशीच साथ द्यावी हीच सदिच्छा
ReplyDeleteThanku! 🙂🙏
Delete