जांबुवंत
मला असं बरेचदा वाटतं की पालकांना मुलांसाठी जांबुवंत व्हावं लागतं. माझा तरी तसाच अनुभव आहे. रामायणात ज्याप्रमाणे मारुती रायाला त्याच्या सामर्थ्याची जांबुवंताने आठवण करून दिली, अगदी तसंच माझ्या मुलाला त्याच्या समर्थ्याची सतत आठवण करून द्यावी लागते...
आमच्या घरी साधारण असा संवाद नित्यनेमाने होत असतो...
मुलगा TV समोर सोफ्यावर ध्यानस्थ बसलेला आहे. त्याच्या हातात रिमोट नावाची माळ आहे जी तो हातात खेळवतो आहे. मी यादी, पिशवी आणि सायकल ची चावी समोर धरून त्याच्याशी बोलणं सुरु करतो...
मी : बाळा जा रे जरा कोपऱ्यावरच्या दुकानातून हे समान घेऊन ये.
मुलगा : सायकल वर जाऊ?
मी : तुला जसं जायचे तसे जा. चालत गेलास तरी हरकत नाही.
मुलगा: पण आत्ता तर अंधार पडलाय, मला अंधाराची भीती वाटते.
मी : हो का? पण तुला आठवतंय का? मागच्या आठवड्यात आपण रात्री सिनेमा बघत होतो. तेव्हा तुला तहान लागली. तू किती पटकन उठून किचन मध्ये एकटा गेला होतास. किचन मध्ये केवढा अंधार होता तरी तू दिवे न लावताच जाऊन आलास. तेव्हा तर तू अजिबात घाबरला नव्हतास. तुला अंधाराची अजिबात भीती नाही...
( मुलाने अंधाराची कशी परवा केली नव्हती ह्याची आठवण करून दिली. प्रथम सामर्थ्य स्मरण समाप्त 🙂)
मुलगा: हा.. ते बरोबर आहे. पण, आत्ता रस्त्यात खूप traffic असेल.
मी : अरे हो! पण, परवा तर तू तुझ्या मित्रांबरोबर mall मध्ये सायकल वरच गेला होता. साधारण हिच वेळ होती नाही का? किराणा दुकान घरा जवळ आतल्या रस्त्यावर आहे. मॉल साठी तर main road ने जावं लागतं ...
(मुलाने Traffic वर कशी मात केली होती ह्याची आठवण करून दिली. द्वितीय सामर्थ्य स्मरण समाप्त 😃)
मुलगा : हा.. पण आता कुत्री असतात आतल्या रस्त्यावर... ते कसे मागे लागतात माहिती आहे ना..
मी : हो का? तीच कुत्र्यांची टोळी ना ज्यांना तुम्ही class ला येता जाता काही तरी खाऊ देता. त्यातल्या प्रत्येक कुत्र्याला तुम्ही नाव पण दिले आहे म्हणे... काळू, रॉकी वगैरे. तुम्ही दिसले की शेपूट हलवत जवळ येतात ते. हो ना?
(एव्हाना मुलाला त्याच्या संपूर्ण समर्थ्याची आठवण झालेली असते. सोफ्यावरून ताडकन उभं रहात...)
मुलगा : द्या ती यादी, मी येतो जाऊन ...
एवढे बोलून आमच्या हनुमंताचे किराणा दुकानाच्या दिशेने कूच होते ...😃😃😃
-विशाल प्रफुल्ल कर्णिक
Comments
Post a Comment