श्री कृष्ण

 



श्री कृष्ण!


महाभारतामध्ये एक गोष्ट आहे…


कुरुक्षेत्राच्या महासंग्रामात अर्जुन आणि कर्ण समोरा-समोर येतात. दोघे ही महान धनुर्धर. दोघांपैकी सर्वश्रेष्ठ कोण? ह्याचा निर्णय होण्याची हीच ती वेळ होती. दोघांमध्ये घन घोर युद्ध सुरु होते.  


अर्जुन एक दिव्य अस्त्र कर्णावर सोडतो. ते अस्त्र कर्णाच्या रथाला लागते आणि तो रथ काही अंतर मागे ढकलला जातो. यावर अर्जुन खूप खुश होतो आणि आपल्या सखा सारथी श्री कृष्णा कडे अभिमानाने बघतो. पण, श्री कृष्ण काही खुश झाल्याचं दिसत नाही. नंतर कर्ण अर्जुनावर दिव्यअस्त्र सोडतो आणि अर्जुनाचा रथ अगदी कणभरच हलतो. पुन्हा एकदा अर्जुन खुश होतो आणि या वेळी श्री कृष्ण देखील खुश होतात. अर्जुनाला वाटत की श्री कृष्ण त्याला शाबासकी देतील. पण, श्री कृष्ण अत्यानंदाने म्हणतात - "तो बघ अर्जुना तुझ्या पेक्षा श्रेष्ठ धनुर्धर !"


यावर सहजीकच अर्जुन अचंबित होतो आणि श्री कृष्णाला म्हणतो - "हे कसे शक्य आहे? माझ्या बाणा ने त्याचा रथ जास्त मागे गेला आणि त्याच्या बाणाने तर माझा रथ अगदी थोडासाच हलला. मग तो माझ्या पेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कसा?" 


ह्यावर श्री कृष्णांने स्मित हास्य केले आणि म्हणाले - "अर्जुना, तुझा रथ ह्या विश्वाचा तारणहार म्हणजे मी स्वतः हाकतो आहे. असे असताना देखील तुझा रथ हलला. विचार कर मी जर नसतो तर तुझा रथ कुठल्या कुठे गेला असता. उध्वस्त झाला असता. म्हणून कर्ण तुझ्या पेक्षा श्रेष्ठ धनुर्धर ठरतो." 


ही झाली गोष्ट.. पण ह्या मागची मला उमजलेली, भावलेली प्रतिकात्मकता अशी -


समजा, आपलं मन जर रथ असेल तर ह्या मनात श्री कृष्ण रुपी सारथी सदैव विराजमान असायला हवा. त्याच्या हाती ह्या मनाची लगाम सुपूर्द करावी. मग किती ही संकटांचे, लोभाचें, अमिषांचे आघात झाले तरी हा रथ(मन) हलणार नाही आणि आपले सर्व "मनोरथ" पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही. नाहीतर आपला रथ (मन) आणि पर्यायाने आपण नक्कीच उद्धवस्त होऊ.. 


जय श्री कृष्ण !!


- विशाल प्रफुल्ल कर्णिक 

Comments

Popular posts from this blog

Long drive

इच्छापत्र

विचार

पुरचुंडी

आपकी नज़रों ने...

विघ्नहर्ता

Choice

Nostalgia

Activa

चक्रम व्यूह