सख्ख प्रेम…
ती खूप तणतण करतच कॉलेज च्या कॅन्टीन मध्ये आली. घरी आई सोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. नेहमीच्या टेबलवर आपल्या मत्रिणी शेजारी जाऊन बॅग आपटली. तिचा तोरा पाहून मैत्रीण सुद्धा थोडी दचकली.
मैत्रीण - बस जरा शांत. मी आले कॉफी घेऊन.
ती - काही नको, आज मूड नाहीये. खूप भांडण झालंय आई सोबत.
मैत्रीण - आज काय झालं तुझ्या कडे?
ती - काही नाही गं. काल रात्री घरी जायला उशीर झाला आणि घरी सोडवायला सिड आला होता. झालं… तेव्हा पासून आईने जो पट्टा सुरु केला की काही विचारू नकोस...
मैत्रीण - तू घरी काही फोन वगैरे नव्हता केला का? उशीर होणार म्हणून…
ती - राहिला फोन करायचा. एखाद वेळी होतं ना असं...
मैत्रीण - तू उशीरा जाणार, वर घरी काही कळवणार नाही, मग बरोबर केलं आई तुला ओरडली ते...
ती - गप यार, आपण काय लहान आहोत का आता?
मैत्रीण - तू तिची बाजू समजून घेणार आहेस का नाही? उद्या जर काही बरं वाईट झालं तर? काळजी वाटणारच ना तिला?
ती - तुझी आई पण अशीच कट कट करते का गं?
मैत्रीण - तुझ्या आईने फक्त तोंडाचा पट्टा चालवला, माझ्या आईने खऱ्या पट्ट्याने झोडपून काढलं असतं. तुला ठाऊक नाही पण अशा बाबतीत ती सावत्र हून सावत्र आहे....
मैत्रिणीच्या बोलण्याने तिच्या अंगातले त्राण निघून गेले. अचानक कुणीतरी फुग्याला टाचणी लावावी आणि त्यातली सगळी हवाच निघून जावी अशी तिची अवस्था झाली. ती तडक उठली आणि धावत कॅन्टीन च्या बाहेर गेली.
घरी येऊन आईला कडकडून मिठी मारली. तिची सख्खी आई तिच्या बालपणीच गेली. वडिलांनी मुलीसाठी दुसरं लग्न केलं. दोन वर्षांपूर्वी वडीलही गेले. पण, आईने कधीच सावत्रपणा दाखवला नव्हता. मैत्रिणीच्या बोलण्यातला ‘सावत्र’ हा शब्द जिव्हारी लागला होता. मनाला पिळवटून टाकले होते. आईला बिलगली आणि दोघींच्या अश्रूतून सख्ख प्रेम ओसंडून वाहिलं…
-विशाल प्रफुल्ल कर्णिक
Comments
Post a Comment